!! " श्री गणेशाय नमः "!!

दप्तर - एक कविता  

Nov 24, 2009


अडगळीच्या खोलीमधलं, दप्तर आजही जेव्हा दिसतं
मन पुन्हा तरूण होऊन,बाकांवरती जाऊन बसतं
प्रार्थनेचा शब्द अन शब्द ,माझ्या कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला ,मग आठवणींचा मेळा जमतो
या सगळ्यात लाल खुणांनी.गच्च भरलेली माझी वही
अपूर्णचा शेरा आणि ,बाई तुमची शिल्लक सही
रोजच्या अगदी त्याच चुका,आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत,आयुष्यातले कोवळे क्षण
पण या सगळ्या शिदोरीवरंच ,बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं,स्वतःलाच रागवून बघतो
इवल्याश्या या रोपट्याची,तुम्ही इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा,सवय आता गेली आहे
चांगलं अक्षर आल्याशिवाय,माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द,आता ठरवून सुद्धा येत नाही
दोन बोटं संस्कारांचा,समास तेवढा सोडतो आहे
फळ्यावरच्या सुविचारासारखी,रोज माणसं जोडतो आहे
योग्य तिथे रेघ मारून,प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पानं,ठळक अक्षरात गिरवलेली
तारखेसह पूर्ण आहे वही ,फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क ,आणि सही तेवढी देऊन जा
कवी : अज्ञात

AddThis Social Bookmark Button


माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster